Sunday, 3 September 2017

गटर बना जानलेवा

डॉ.अमरापूरकर आणि त्यांची एन्डोस्कोपी

 

वर्ष दोन वर्षांपूर्वी

दक्षिण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात,

एका वैद्यकीय परिषदेत डॉ.अमरापूरकर सांगत होते,

"मित्रहो,आता तंत्रज्ञान अधिक पुढं गेलंय

एंडोस्कोपीच्या पुढं आलीये आता 'कॅप्सूल एन्डोस्कोपी'

…म्हणजे एंडोस्कोप तोंडाद्वारे पोटापर्यंत

आता सरकावण्याची गरज नाही..

काही एम.एम.डायमीटर असलेली

एक कॅप्सूल फक्त गिळायची

हो फक्त गिळायची...

ती प्रवास करेल

अन्ननलिकेतून जठरात

जठरातून छोट्या आतड्यात

 मोठ्या आतड्यात आणि थेट गुदद्वारापर्यंत

मुख्य म्हणजे कॅप्सूल मध्ये असेल एक कॅमेरा

जो छायांकित करेल पोटाच्या आतलं सारं गौडबंगाल 

घेईल फोटो प्रत्येक भागाचा आतून

जमवले काही जीबी डेटा

दुसऱ्या दिवशी गुदद्वारातून बाहेर पडेपर्यंत

..आपण ती कॅप्सूल विष्ठेतून मिळवायची आणि

मिळवायचा इत्यंभूत डेटा

जो देईल ए टू झेड निदान

मित्रहो,आता येणारे दिवस कॅप्सूल एंडोस्कोपीचे आहे

ऍसिडिटी असो,अपचन असो,गॅस असो

वा असो पोटात एखादी गाठ

आतड्याचा टीबी असो वा असो मुळव्याधानं लावलेली वाट

तोंडातल्या अल्सरपासून पोटाच्या कँसरपर्यंत

साऱ्यांचाच रहस्य खोलेल ही कॅप्सूल

येणारे दिवस असतील कॅप्सूल एंडोस्कोपीचे"

 परवाच्या मुसळधार पावसात

प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ

आंतरदुर्बिन तज्ज्ञ डॉ.अमरापूरकर

उघड्या गटाराच्या मेनहोलमध्ये पडून वाहून गेले

एवढा किमती जीव काय गटारात वाहून जावा?

असा कसा वाहून जावा?

डॉक्टरांनी शेवटच्या क्षणी

डोळ्यांनी टिपलं असेल सारं

गुदमरतांना जीव पाण्यात

उघड्या डोळ्यांनी बघितलं असेल सारं सारं

पडता पडता दिसला असेल त्यांना

खुणेचा बांबू ज्यानं सांगितलं असेल ओरडून

इथं उघडं गटार आहे

बांबूच्या टोकाला बांधलेल्या

खुणेच्या भगव्या झेंड्यानंही सांगितलं असेल

'येथे गटार उघडं आहे'

 या पंचतारांकित शहराच्या खालून

वाहून जातांना त्यांनी

भोगली असेल सारी सारी घुसमट

प्लास्टिक,थर्मोकोल यांच्यासह

साऱ्या व्यवस्थेचा तुंबलेला गाळ

वाहत जातांना ड्रेनेज लाईनमधून

त्यांनी बघितला असेल

ड्रेनेज आणि ड्रिंकिंग लाईनचा समांतर प्रवास

त्यासोबत प्रवास करणारे फायबर-ऑप्टिकचे नेटवर्क

मॉल,हॉटेल,इमारती,सभागृह

कॉलेज,मंदिर..अगदी सचिवालय

विधानसभा यांच्या

खालून प्रवास करतांना

त्यांना कळलंच असेल,

'पाणी कुठं कुठं मुरतंय' छातीवर स्वप्नांचे इमले उभे करणाऱ्या

मुंबईच्या पोटात काय काय आहे ?

हे सारं टिपलंच असेल त्यांच्या तज्ज्ञ डोळ्यांनी

 कदाचित निदानच केलं असेल त्यांनी

'मुंबई का तुंबते? शहरं का तुंबतात?

कारण ते तज्ज्ञच होते हो...

आता वरळीच्या किनाऱ्यावर सापडलेल्या

त्यांच्या मृतदेहाचं करा पोस्टमार्टम

मिळवा सारं सारं डेटा

कारण जाता-जाता त्यांनी या शहराची

 एन्डोस्कोपी केलीये..

हो डॉ.अमरापूरकरांनी केलीये अगदी'कॅप्सूल एन्डोस्कोपी'

 

(सवयीप्रमाणे लेखकाचं नाव शोधू नका..हा एंडोस्कोपी रिपोर्ट आहे तुमच्या शहराचा आणि तुमचाही)
Unknown

No comments:

Post a Comment